बदलत्या परिस्थितीनुसार माजी सहकारी अरविंद केजरीवाल यांच्याविषयीचे आपले मतही बदलले आहे. या बदललेल्या मताची आताच कारणमीमांसा केल्यास आणखी अडचणी उद्भवतील. केजरीवाल यांच्याविषयी मत का बदलले याची आपण योग्यवेळी वाच्यता करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
केजरीवाल आणि त्यांच्या प्रामाणिक उमेदवारांचे आपण निवडणुकांमध्ये समर्थन करू, असे अण्णांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. पण गेल्या आठवडय़ात अण्णांनी आपले मत बदलले आणि केजरीवाल सत्तेचे लोभी झाले असून त्यांना आपले मतही मिळणार नाही, असे अण्णांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात म्हटले होते. आपण योग्य मार्गावर असल्याचे अण्णांच्या लक्षात येईल तेव्हा ते आपल्याला साथ देतील, असे केजरीवाल यांनी म्हटले होते. केजरीवाल स्वप्न पाहात आहेत. त्यावर आपण काय बोलू शकतो, असा टोला अण्णांनी लगावला.  
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल विधेयकाच्या मागणीवरून गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अण्णा हजारे यांना पुढे करून केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्लीत राष्ट्रव्यापी आंदोलन सुरु केले होते. पण जंतरमंतरवर सुरु झालेल्या या आंदोलनाचा शेवटही जंतरमंतरवरच अण्णा आणि केजरीवाल यांच्या विभक्त होण्याने झाला. त्यानंतर अण्णा आणि केजरीवाल यांच्यातील तफावत वाढतच गेली.
केजरीवाल यांनी ‘आम आदमी’ पक्षाची स्थापना करून राजकारणात उडी घेतली आहे, तर अण्णा हजारे यांनी लोकपाल आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.