माकपचे ज्येष्ठ नेते व मार्क्सवादी विचारवंत पी.गोविंद पिल्ले यांचे आज येथे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. केरळातील राजकीय व सांस्कृतिक वर्तुळावर त्यांचा गेली सहा दशके प्रभाव होता. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, बराच काळापासून पिल्ले यांची प्रकृती बरी नव्हती, त्यात काल रात्री त्यांचे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी प्रा. राजम्मा, मुलगा एम.जी.राधाकृष्णन व कन्या पार्वती यांचा समावेश आहे. त्यांचे जावई व्ही. शिवकुट्टी हे माकपचे तिरूअनंतपुरमचे आमदार आहेत. पीजी या नावाने ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने केरळच्या डाव्या राजकारणातील स्वातंत्र्यलढय़ाच्या काळापासूनची एक पिढीच संपली आहे. केरळच्या राजकीय व सांस्कृतिक वर्तुळात त्यांनी अनेक स्तरांवर काम केले. मल्याळम् साहित्यावरही त्यांनी समीक्षक, इतिहासकार व दर्जेदार स्तंभलेखक म्हणून ठसा उमटवला होता. आंतरराष्ट्रीय संबंध ते भारतीय लोकपरंपरा असा त्यांच्या लेखनाचा प्रचंड मोठा आवाका होता. पिल्ले हे 1957, 1964, 1967 असे तीनदा विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना पक्षाने त्यांच्या प्रकाशनांचे नेतृत्व करण्यास सांगितले. माकपच्या देशाभिमानीया मुखपत्राचे ते मुख्य संपादक होते. पिल्ले हे सधन कुटुंबातून आलेले होते व 1964 च्या फाटाफुटीनंतर ते माकपमध्ये आले. त्यापूर्वी त्यांनी भाकपसाठी 1964 मध्ये दिल्लीत काम केले होते. ते स्पष्टवक्ते असल्याने काहीवेळा त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. चीनमध्ये बीजिंगम येथे तिआनानमेन चौकात 1990 मध्ये जो उठाव क्रूर पद्धतीने दडपण्यात आल्या त्याबाबत पिल्ले यांनी उघड टीका केली होती. केरळात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.