मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक हाफिझ सईद याच्याविरोधात भारताने न्यायालयात टिकू शकतील असे पुरावे दिले तर त्याच्यावर पाकिस्तान कारवाई करील, असे तुणतुणे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी पुन्हा वाजविले आहे.
जर भारताने सईद याच्याविरोधात पुरावे दिले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल काय, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, होय, आम्ही निश्चित कारवाई करू. तो कोठडीत होता, त्याच्याविरोधात दिलेले पुरावे पुरेसे नाहीत त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले.
सईद हा सध्या ‘जमात उद दावा’ चा प्रमुख असून संयुक्त राष्ट्रांनी मुंबई हल्ला प्रकरणी या संघटनेस बेकायदा प्रतिबंधित घोषित केल्यानंतर त्याला सहा महिने नजरकैदेत टाकण्यात आले. लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला सोडून देण्यात आले. लष्कर-ए-तय्यबाचा प्रमुख असलेला सईद याला अनेकदा काही घटनांमध्ये अटक करण्यात आली होती, पण नंतर लगेच सोडून देण्यात आले. अमेरिकेने त्याला पकडण्यासाठी १ कोटी डॉलरचे इनाम लावले असले तरी तो लाहोरमध्ये खुलेआम हिंडत आहे. तो नेहमी मेळावे घेऊन भारताच्या विरोधात गरळ ओकत फिरतो.
या मुलाखतीत खार यांनी सांगितले की, भारतातील स्थिती मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर फार वाईट झाली. अतिशय कठीण अवस्थेतून उभय देश गेले, याची मला जाणीव आहे.
पाकिस्तान सरकारने स्थिती सुधारण्यासाठी भरीव प्रयत्न केले. विश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. गेल्या चाळीस वर्षांत झाले नाहीत असे काही धोरणात्मक निर्णयही घेतले. त्यामुळे व्यापार सुरळीत होऊ लागला आहे. परिणामी दोन्ही देशांत विश्वासवर्धक उपाययोजनांना पोषक वातावरण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात अस्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी भारत व पाकिस्तान यांनी एकमेकांना मदत केली आहे. तर, भारताने जागतिक व्यापार संघटनेत युरोपीय समुदायाने पाकिस्तानला दिलेल्या व्यापार सवलतींना मान्यता दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आशियायी देशांचे गटच जगभरात आर्थिक विकासाची चक्रे चालवित आहेत, असे सांगून त्यांनी असा सवाल केला की, या भागात आम्ही भांडणतंटे व दहशतवादाला पाठिंबा देत आहोत काय?
भारत व पाकिस्तान यांनी एकमेकांविषयी थोडा विश्वास निर्माण केला तरी सुरुवात करता येईल. व्यापक विश्वास संपादण्यास वेळ लागेल यात शंका नाही, मात्र काश्मीर प्रश्नापेक्षा कमी मतभेद असलेल्या मुद्दय़ांपासून सुरुवात करता येईल. काश्मीरचा प्रश्न गेल्या साठ वर्षांत लष्करी मार्गाने सोडवता आला नाही. शत्रुत्व, द्वेष याने प्रश्न सुटत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पाकिस्तान भेटीविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, मनमोहन सिंग हे पाकिस्तानला येऊ इच्छितात; ती त्यांची व्यक्तिगत इच्छाही आहे.