राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या भेटीच्या पाश्र्वभूमीवर शांत झालेल्या जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानने सोमवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत मॉर्टर आणि स्वयंचलित शस्त्रास्त्रांद्वारे जोरदार मारा केला.  भारत-पाकिस्तान दरम्यान होणारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या पातळीवरील चर्चा रद्द झाल्याने पुन्हा पाकिस्तानने कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्य़ातील बालकोटे भागात भारतीय लष्कराच्या तळावर ६० मिमीच्या उखळी तोफा व स्वयंचलित शस्त्रांद्वारे जोरदार हल्ला करण्यात आला. यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.  हा गोळीबार जवळपास २० मिनिटे सुरू होता, असे लष्करी सूत्रांनी सांगितले.पाकिस्तानने पूंछ भागात १९ ऑगस्टला शेवटचा गोळीबार केला होता. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या भेटीच्या पाश्र्वभूमीवर तो बंद करण्यात आला होता. ऑगस्टमध्ये आतापर्यंत ५२ वेळा आणि या वर्षांत २४५ वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.