पाकिस्तानचे दूरचित्रवाणी अँकर (वृत्त निवेदक) आज संभाव्य प्राणघातक हल्ल्यातून बचावले. त्यांच्या मोटारीत लावलेले स्फोटक वेळीच लक्षात आल्याने पुढचा अनर्थ टळला. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला लगेच पाचारण करण्यात आले व बॉम्ब निकामी करण्यात आला.
जिओ न्यूज वाहिनीचे अँकर हमीद यांच्या मोटारीत बॉम्बसदृश स्फोटक लावण्यात आले होते. हमीद मीर हे इस्लामाबाद येथील जवळच्या बाजारपेठेतून परतले त्या वेळी त्यांच्या मोटारचालकाला वेळीच हे स्फोटक लावले असल्याचे लक्षात आले. हा बॉम्ब एका काळ्या रंगाच्या बॅगेत, पत्र्याच्या डब्यात ठेवलेला होता. स्थानिक बनावटीच्या या बॉम्बमध्ये डेटोनेटर व बॅटरी वापरण्यात आली होती असे वाहिनीच्या वृत्तात म्हटले आहे. आतापर्यंत कुठल्याही गटाने या कृत्याची जबाबदारी घेतलेली नाही. हमीद मीर हे रोज रात्री जिओ न्यूज वाहिनीवर एका चर्चा कार्यक्रमाचे सादरीकरण करतात. दरम्यान पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून दंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीत दोन पत्रकारांचाही समावेश असणार आहे. अनेक पत्रकारांना दहशतवाद्यांकडून धमक्या मिळत असल्याची बाब सरकारने गांभीर्याने घेतली असल्याचे ते म्हणाले. हमीद मीर यांच्या गाडीत बॉम्ब ठेवणाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यांना त्यांनी पाच कोटी रूपयांचे इनाम जाहीर केले आहे.