विशिष्ट रकमेच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड सक्ती
देशात अजूनही मोठय़ा प्रमाणावर काळा पैसा असून त्याला आळा घालण्यासाठी सरकार विशिष्ट रकमेच्या पलीकडे पॅन कार्ड सक्तीचे करणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली.

नक्की वाचा:काळा पैसा भारतात आणण्याची पंतप्रधानांची इच्छा नाही

 
परदेशातील काळा पैसा ३० सप्टेंबरच्या मुदतीत जाहीर न केलेल्यांना परिणाम भोगावे लागतील, असेही जेटली यांनी स्पष्ट केले. एचएसबीसीमधील ६५०० कोटींची माया व प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेला ३७७० कोटींचा काळा पैसा यांची तुलना करण्यासारखी स्थिती नाही अशी कबुली देऊन ते म्हणाले की, सरकार आता विशिष्ट रकमेच्या पलीकडे पॅन कार्ड सक्तीचे करणार आहे त्यामुळे देशातील काळ्या पैशाला आळा बसण्यात मदत होईल.

देशात अजून बराच काळा पैसा असून लोकांनी प्रत्यक्ष चलन न वापरता प्लास्टिक मनी म्हणजे कार्ड्स वापरली पाहिजेत. मुद्रा बँक योजनेत उद्योजकांना दिलेली कर्जे एटीएममधूनच काढता येतील. जास्त कर भरावा लागण्याची भीती पूर्वीच्या व्यवस्थांनी निर्माण केली, आता आम्ही कराचे सुसूत्रीकरण करीत आहोत, कराचे दर जाचक नाहीत व कमी कमावणाऱ्यांच्या हाती जास्त पैसा यावा, प्लास्टिकमनीला उत्तेजन मिळावे हा हेतू आहे.
एचएसबीसी व लिशटेनस्टेन येथील एलजीटी बँकेत ६५०० कोटींचा काळा पैसा आहे पण एकदम काळा पैसा जाहीर करण्याच्या योजनेत केवळ ६३८ लोकांनी ३७७० कोटींचा काळा पैसा उघड केला आहे. ज्यांनी मुदतीत काळा पैसा जाहीर केला नाही त्यांना ३० टक्के कर व ९० टक्के दंड भरावा लागेल व १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल, असेही जेटली यांनी सांगितले.