गोव्यातील बंद पडलेल्या खाण उद्योगाच्या समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित मंत्रालयांकडे हा मुद्दा उपस्थित करून बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी येथे दिले खाण कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘गोवा मायनिंग अ‍ॅफेक्टेड पीपल्स फ्रण्ट’ संघटनेने येथील आझाद मैदानावर गेल्या पंधरवडय़ापासून आंदोलन सुरू केले आहे. या संघटनेच्या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर पवार यांनी हे आश्वासन दिले.
पर्यावरण व वनविभाग, कामगार मंत्रालय आणि खाणउद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी दिल्लीत आठवडाभरात चर्चा करण्यात येईल. गोव्यातील खाण उद्योग बंद पडल्यामुळे राज्याच्या जनतेचे दैनंदिन जीवनमान कसे विस्कळीत झाले आहे, याकडे संबंधित मंत्रालयांचे लक्ष वेधण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.