तुमचा भविष्य निर्वाह निधी किती जमा झाला आहे. व्याजदर योग्य प्रमाणात मिळते आहे की नाही. तुम्हाला त्यातून किती उचल घेता येईल वगैरे असंख्य प्रश्नांची उत्तरे आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) खातेदारांना एका क्लिकसरशी प्राप्त होणार आहेत. भविष्य निर्वाह निधीच्या संकेतस्थळावर शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या ई-पासबुक सुविधेच्या माध्यमातून देशभरातील पाच कोटी पीएफ खातेधारकांना ही संधी प्राप्त होणार आहे.
केंद्रीय भविष्य निवार्ह निधी आयुक्त आर. सी. मिश्रा यांच्या हस्ते ई-पासबुक सुविधेचे उद्घाटन झाले. http://www.epfindia.gov.in.. या संकेतस्थळावर खातेधारकांना आजपासून ई-पासबुकची सुविधा उपलब्ध होईल. तसेच अकाऊंट स्टेटमेंटही खातेदारांना डाऊनलोड करता येणार आहे.
सुविधेचा लाभ यांना
* सक्रिय खातेदार, ज्यांचे चलान-कम-रिटर्न संकेतस्थळावर आधीच अपलोड आहे.
यांना लाभ नाही
* ज्यांच्या खात्यावर गेल्या तीन वर्षांपासून कोणतीही जमा झालेली नाही त्यांना या सुविधेचा लाभ नाही
पीएफ ट्रस्टच्या सभासदांसाठी
* पीएफ ट्रस्टच्या सदस्यांना सध्या ही सुविधा उपलब्ध नाही
* मात्र, ट्रस्टच्या सदस्यांना ही सुविधा त्यांच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यास सांगितले जाईल
विशेष विनंती
* ज्या खातेदारांनी नोकरी सोडली आहे किंवा ज्यांचे खाते निष्क्रीय आहे. त्यांना विशेष विनंतीद्वारे ही सुविधा उपलब्ध करून घेता येईल.
सुविधेचा लाभ कसा घ्यायचा..
* छायाचित्र व पॅन, आधार कार्डावरील क्रमांक, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी क्रमांक, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व शिधापत्रिका यांपैकी एकाचा वापर करून खातेधारक पोर्टलवर नोंदणी करू शकतील.
*  त्यांचा मोबाइल क्रमांक हा पासवर्ड असेल.
*  त्यानंतरच त्यांचे खाते सक्रिय होईल.
* खातेदारांनी ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना खात्यावरील तपशील पाहता येईल.
* एकावेळी एकाच मोबाइल क्रमांकाने नोंदणी करता येईल.