केंद्र सरकारने हाज यात्रेच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी भारताच्या हाज समितीने लागू केल्यामुळे यापुढे हाज यात्रेला सरकारी अनुदानाद्वारे जाण्याची संधी प्रत्येकाला आयुष्यात एकदाच मिळणार आहे. यापूर्वी हाज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांना दर पाच वर्षांतून एकदा सरकारी अनुदानाचा लाभ घेता येत असे.
भारतीय हाज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शकीर हुसैन यांनी शुक्रवारी याबाबत अधिक माहिती दिली. यापुढे हाज यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपण सदर यात्रेस पहिल्यांदाच जात असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार असल्याचे हुसैन यांनी सांगितले.
या यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या सरकारी मदतीचा लाभ इतरांना मिळावा तसेच आजवर ज्यांना जाता आलेले नाही अशांपर्यंत सरकारी अनुदान पोहोचावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे हुसैन यांनी नमूद केले. नवीन नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही डॉ. शकीर हुसैन यांनी दिला.
१८ जानेवारी रोजी भारतीय हाज समितीला केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या आदेशाद्वारे हाज यात्रेला दुसऱ्यांदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा जाणाऱ्या भाविकांचा विचार सरकारी अनुदानासाठी करण्यात येऊ नये असे सुचविले होते. चालू वर्षी हाज यात्रेसाठीचे अर्ज ६ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.