मतदानोत्तर जनमत चाचण्यांना सपशेल फोल ठरवत ब्रिटिश मतदारांनी पुन्हा एकदा पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालात हुजूर पक्षाने तब्बल ३२७ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. मजूर पक्षाला फक्त २३२ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. सलग दुसऱ्यांदा हुजूर पक्ष सत्तारूढ होणार आहे.
ब्रिटिश संसद निवडणुकीत अनेक भारतीय विजयी
वीस वर्षीय मेरी ब्लॅक ब्रिटनची सर्वात तरुण संसदपटू
६५० सदस्यांच्या प्रतिनिधी सभागृहासाठी (हाऊस ऑफ कॉमन्स) गुरुवारी ब्रिटनमध्ये मतदान झाले. पाच कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानानंतर घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांच्याdv10 आधारे सत्तारूढ हुजूर पक्षाला या निवडणुकीत फटका बसून त्रिशंकू संसद अस्तित्वात येईल, असाच अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, शुक्रवारच्या निकालांमुळे सर्वच जनमत चाचण्या तोंडावर आपटल्या. पंतप्रधान कॅमेरून यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत ब्रिटिश मतदारांनी त्यांना स्पष्ट बहुमत प्राप्त करून दिले. या निकालांमुळे ब्रिटनमध्ये आघाडी सरकारचे पर्वही संपुष्टात आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून हुजूर पक्ष व लिबरल डेमॉक्रॅट्स यांचे आघाडी सरकार ब्रिटनमध्ये सत्तेत होते. मात्र, नव्या निकालांमुळे आता कॅमेरून यांना लिबरल डेमॉक्रॅट्सच्या कुबडय़ा वापराव्या लागणार नाहीत. निकालांचे कल जाहीर होऊ लागल्यानंतर कॅमेरून यांनी राणी एलिझाबेथ यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.      
२७ मे रोजी नवीन संसद ब्रिटनमध्ये अस्तित्वात येईल. युरोपीय समुदायाच्या सदस्यत्वावर जनमत घेणे व स्कॉटलंड व वेल्समध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण या दोन प्रमुख घोषणा कॅमेरून यांनी प्रचारादरम्यान केल्या होत्या.

मजूर पक्षाला हादरा..
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा नाकारल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे. मजूर पक्षाला या निवडणुकीत अवघ्या २३२ जागांवरच विजय मिळवता आला. मजूर पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार एड मिलिबँड यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.

मोदींकडून अभिनंदन
डेव्हिड कॅमेरून यांच्या विजयानंतर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. ‘फिर एक बार कॅमेरून सरकार, हार्दिक अभिनंदन’, या शब्दांत मोदी यांनी कॅमेरून यांचे कौतुक केले.

लिबरलस्नाही दणका
गेल्या निवडणुकीत तब्बल ५७ जागांवर विजय प्राप्त करणाऱ्या लिबरल डेमॉक्रॅट्स पक्षाला अवघ्या आठ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे नव्या संसदेत त्यांच्या पक्षाला तितकेसे महत्त्व राहणार नाही.

भारतीय वंशाचे दहा उमेदवार विजयी
ब्रिटनमधील निवडणुकीत भारतीय वंशाचे १० उमेदवार निवडून आले आहेत त्यात कीथ वाझ, प्रीती पटेल, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक, वीरेंद्र शर्मा, आलोक शर्मा, शैलेश वारा, सुएला फर्नाडिस, लिसा नंदी यांचा समावेश आहे.

सर्वात गोड असा हा क्षण आहे. मतदारांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिले असल्यामुळे आमचा जाहीरनामा राबवणे आम्हाला शक्य होणार आहे.
– डेव्हिड कॅमेरून, पंतप्रधान

मजूर पक्षाच्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. मी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असून योग्य व्यक्तीने या पक्षाला योग्य दिशा देण्याची हीच वेळ आहे.
 – एड मिलिबँड, मजूर पक्षाचे नेते