दहशतवाद हा मुद्दा एका देशापुरता मर्यादित नसून संपूर्ण जगावर याचे सावट असल्याचे म्हणत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आसिआन’ संघटनेतील देशांनी एकत्रितपणे या दहशतवादाच्या आव्हानाचा मुकाबला करावयास हवा, असे म्हटले. मलेशियामध्ये सुरु असलेल्या  ‘आसियान’या उद्योग आणि गुंतवणुकीवर केंद्रित असलेल्या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मोदी बोलत होते.
पॅरिस, अंकारा, बैरुत आणि माली सारख्या देशात दहशतवाद हल्ले झाले. तसेच सिनाई येथे दहशतवाद्यांनी रशियन विमान पाडले. या घटनांना अनुसरुन दहशतवाद हा मुद्दा एका देशापुरता मर्यादित नसून संपूर्ण जगावर याचे सावट आहे. त्यामुळे आशियाई संघटनेतील देशांनी एकत्रित येऊन दहशतवादविरोधात नवीन योजनेबाबत विचार करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. ‘आसिआन’ देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्य चांगले असले तरी ते प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले पाहिजे. त्यासाठी एक दहशतवादविरोधी सर्वंकष जाहीरनामा करावा, असे मोदी म्हणाले. जगातील कोणत्याही देशाने दहशतवादाचा वापर करू नये अथवा दहशतवादाला पाठिंबा देऊ नये, असेही मोदींनी यावेळी म्हटले. तसेच दक्षिण चीन सागरातील प्रादेशिक अथवा सांगरी वाद शांततेच्या मार्गाने मिटवावेत असाही सल्ला मोदींनी यावेळी दिला.