चंदीगढमधील आपल्या दौऱयामुळे सर्वसामान्य जनतेला ज्या काही गैरसोयीला सामोरे जावे लागले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिलगिरी व्यक्त केली. मोदी शुक्रवारी चंदीगढच्या दौऱयावर होते. त्यांच्या दौऱयामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. त्याबद्दलही मोदी यांनी खेद व्यक्त केला. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी घडल्याप्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि या सगळ्याला कोण जबाबदार आहे, हे सुद्धा निश्चित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
मोदी यांच्या दौऱयानिमित्त चंदीगढमधील शिक्षण खात्याने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शुक्रवारी सुटी दिली होती. दौऱयाच्या पार्श्वभूमीवर शहरात होणाऱया वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर शुक्रवारी होणाऱया विविध परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात आल्या.
मोदींच्या सभेसाठी येणाऱया लोकांना गाड्या उभ्या करता याव्यात, यासाठी काही ठिकाणच्या दफनभूमीही काही तासांसाठी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. याबद्दल सोशल मीडियावर काही जणांनी संताप व्यक्त केला.