उबर टॅक्सीसेवेतील एका टॅक्सीचालकाने शुक्रवारी रात्री दिल्लीत एका तरुणीवर केलेल्या बलात्काराचे तीव्र पडसाद मंगळवारी राज्यसभेत उमटले. हा बलात्कार म्हणजे राष्ट्रीय शरमेची बाब असून आपल्यालाही या घटनांनी वेदना होत असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनीही उबरप्रकरणी वेगाने तपास सुरू केला असून अनेक सरकारी नियमांचा भंग केल्यावरून उबरवरही गुन्हा नोंदवला आहे.
२००३पासून यादवच्या नावावर अनेक कलमांखाली गुन्ह्य़ांची नोंद होत आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्य़ातील यादवने तेथेही विनयभंग, छेडछाड आणि बलात्कार असे गुन्हे केले आहेत. २०११मध्ये दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथे बलात्कार केल्याने त्याला अटक झाली होती. सात महिने तो तिहार तुरुंगातही होता. त्यानंतर चांगल्या वर्तणुकीच्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याची जामिनावर सुटका झाली होती. हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून ते त्याने कसे मिळवले, याचाही तपास सुरू आहे.
दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले की, उबर या वेबटॅक्सीसेवेनेही अनेक सरकारी नियमांची आणि निकषांची पायमल्ली केल्याचे उघड झाले आहे. त्यावरून त्यांच्याविरोधातही फसवणुकीचा आणि नियमभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
उबरचे विपणनविषयक व्यवस्थापक गगन भाटिया यांचीही पोलिसांनी चौकशी केली. आपल्या सेवेत चार हजार टॅक्सी असून सार्वजनिक वाहतुकीसाठी चालकांना बॅच आवश्यक असल्याच्या नियमाची आम्हाला काहीच कल्पना नव्हती, असे भाटिया यांनी सांगितले.
बस्सी यांनी आतापर्यंतच्या तपासाबाबत तसेच दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी उचललेल्या पावलांबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांच्याशी चर्चा केली.
रेडिओ टॅक्सीसेवा संघटनेनेही दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि उबर प्रकरणावरून सर्वच खाजगी टॅक्सीसेवांना दोषी मानू नये, असे आवाहन केले. १३ टॅक्सीसेवांची शिखर संस्था असलेल्या या संघटनेने, आपले सर्व टॅक्सीचालक हे परवानाप्राप्त असून आम्ही सरकारी नियमांची काटेकोट अंमलबजावणी करतो, असे सांगितले.

लोकप्रतिनिधी आक्रमक
बलात्कारी टॅक्सीचालक शिवकुमार यादवने याआधीही असेच गुन्हे केले आहेत, यावरून आणि दिल्ली वाहतूक पोलीस परवाने देताना छाननी करतात की नाही, यावरून राज्यसभेत सदस्यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. देशात या वर्षी नोव्हेंबपर्यंत बलात्काराचे २५ हजार गुन्हे नोंदले गेले असून ही देशासाठी शरमेची बाब आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. यानंतर सर्वपक्षीय सदस्यांनी असे प्रकार घडत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी या प्रकरणात यादवच्या कागदपत्रांची छाननी करण्यात दिल्ली पोलिसांनीही कुचराई केल्याबाबत सरकार लक्ष घालणार का असा सवाल केला व  बलात्काराचा गुन्हा करणाऱ्यांची छायाचित्रे  संकेतस्थळावर टाकण्यास केलेली सुरुवात आता मोडीतच निघाल्याचा आरोपही केला.