देशभरात खळबळ माजवणाऱ्या मद्यसम्राट पाँटी चड्डा यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुखदेव सिंग नामधारी यांच्या उत्तराखंड येथील घरातून शनिवारी पोलिसांनी रिव्हॉल्वर जप्त केले आहे. चड्डा यांच्या हत्येसाठी सदर रिव्हॉल्वर वापरण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
१७ नोव्हेंबर रोजी मद्यसम्राट पाँटी चड्डा आणि त्यांचा भाऊ रहदीप यांच्यावर छत्तरपूर येथे गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळीबारात दोघे भाऊ मरण पावले होते. याप्रकरणी उत्तराखंड अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आलेल्या नामधारी यांना पोलिसांनी शुक्रवारी बाजपूर येथील घरातून अटक केली होती. पोलिसांनी नामधारी यांना शनिवारी पुन्हा बाजपूर येथील निवासस्थानी नेऊन त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ७.६२ एमएमचे भारतीय बनावटीचे रिव्हॉल्वर जप्त केले. याच रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्याकांडाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी नामधारी यांना बाजपूर तसेच उत्तर प्रदेशमधील अनेक भागांत नेऊन चौकशी केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.