आकाश-२ टॅबलेट आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांकरिताच्या विक्रीसाठी खुला करण्यात आला असून आकाश टॅबलेटची ती प्रगत आवृत्ती आहे.
विद्यार्थ्यांसाठी आकाश-२ टॅबलेटती किंमत ११३० रुपये राहणार आहे, तो अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तसेच विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याला १ गिगाहर्ट्झ क्षमतेचा संस्कारक (प्रोसेसर) आहे. त्याची क्षमता ५१२ मेगाबाइट असून टचस्क्रीन ७ इंचांचा आहे. सर्वसाधारण कामांसाठी त्याची बॅटरी तीन तास चालते.आयआयटी मुंबईच्या पुढाकाराने व सीडॅकच्या सहकार्याने तो तयार केला आहे. डेटाविंडने तो वितरित केला असून सरकारने तो या कंपनीकडून २२६३ रुपये प्रतिनग या दराने खरेदी केला आहे. त्याला सरकारने ५० टक्के अनुदान दिले असून विद्यार्थ्यांना तो ११३० रुपयांना दिला जाणार आहे असे डेटाविंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत टुली यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना तो मोफत उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारांनी आर्थिक भार उचलावा असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पहिले एक लाख आकाश २ टॅबलेट हे अभियांत्रिकी महाविद्यालये व विद्यापीठे यांना उपलब्ध केले जाणार आहेत. एकूण २२ कोटी विद्यार्थ्यांना आकाश-२ मिळणार असून येत्या पाच ते सहा वर्षांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. येत्या सोमवापर्यंत २० हजार विद्यार्थ्यांना आकाश-२ टॅबलेट मिळणार आहे. हा टॅबलेट लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवरही चालू शकतो, त्यावर आधार योजनेतील ओळख पटवता येते तसेच रोबोट चालवता येतो असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.