राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे मंगळवारी सकाळी नवी दिल्ली येथे निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीतील लष्कराच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रपती कार्यालयाकडून ट्विटरवर याबद्दलची माहिती देताना दु:ख व्यक्त करण्यात आले आहे.
शुभ्रा मुखर्जी यांना हृदयविकाराचा त्रास होता. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना ७ ऑगस्ट रोजी आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच ओडिशा दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती तातडीने दौरा अर्धवट सोडून दिल्लीत दाखल झाले होते.