अशांत क्षेत्र असलेल्या पश्चिम आशियाच्या सहा दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी मोक्याच्या जागी वसलेल्या जॉर्डन दौऱ्याने केली. राजधानी अम्मानमध्ये त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले, तसेच राजे अब्दुल्ला यांनी त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनातही ते सहभागी झाले.

राष्ट्रपती दिल्लीहून सहा तासांच्या प्रवासानंतर अम्मान विमानतळावर पोहोचल्यानंतर थेट अल हुसैनी राजवाडय़ाकडे रवाना झाले. तेथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रपती आणि जॉर्डनमधील सत्ताधारी राजे अब्दुल्ला यांची प्रतिनिधीस्तरीय चर्चेपूर्वी अर्धा तास भेट झाली.
यानंतर राजे अब्दुल्ला यांनी प्रणव मुखर्जी यांच्यासाठी भोजनाचे आयोजन केले. मुखर्जी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री थावरसिंह गहलोत आणि सहा खासदारांचे शिष्टमंडळही गेले आहे. जॉर्डनमधील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पॅलेस्टाईन व इस्रायलला जाणार असलेले मुखर्जी हे या देशांना भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रप्रमुख आहेत. अद्याप परराष्ट्र व्यवहारमंत्रीही या देशांमध्ये गेलेले नाहीत. आपल्या या तीन देशांच्या दौऱ्याचे वर्णन राष्ट्रपतींनी ‘ऐतिहासिक’ असे केले. भारत व जॉर्डन यांच्यात राजनैतिक संबंध स्थापन झाल्यानंतर गेल्या ६५ वर्षांत जॉर्डनला भेट देणारे मुखर्जी हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. यापूर्वी पंतप्रधान या नात्याने राजीव गांधी १९८८ साली येथे आले होते. भारतीय कंपन्यांनी या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी जॉर्डन हा तळ ठरू शकतो. त्यामुळे राष्ट्रपतींच्या वास्तव्यात दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या संधी विस्तारण्याची भारताला आशा आहे. या दौऱ्यात मुखर्जी जॉर्डन विद्यापीठाला भेट देऊन तेथील शिक्षक व विद्यार्थी यांना संबोधित करणार आहेत. अम्मानमधील भारतीय समुदायासाठी तेथील भारतीय राजदूतांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत.