* मारुतीच्या सर्व गाडय़ा २० हजारांनी महागणार
* १ जानेवारी २०१३ चा मुहूर्त

नव्या वर्षांत नवीन काय घ्यायचे याचे आराखडे आखण्यास एव्हाना सुरुवात झाली असेल. कोणी आयपॅड, तर कोणी टॅबलेट पीसी, कोणी घर, तर कोणी बंगला.. मात्र, गाडी घेण्याचे कोणी ठरवत असेल तर त्यांना आपल्या ‘बजेट’मध्ये किमान २० हजार रुपयांची वाढीव तरतूद करावी लागणार आहे. नव्या वर्षांची सुरुवात गाडय़ांच्या वाढीव किंमतीनेच होणार आहे. त्यात मारुतीने आघाडी घेतली असून आपल्या सर्व वाहनांच्या किंमतीत मारुतीने २० हजार रुपयांपर्यंतची वाढ करण्याचे ठरवले आहे.
कार उत्पादनात सद्यस्थितीला मारुतीच आघाडीवर आहे. चलनातील वाढत्या फरकामुळे मारुतीने वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रुपयाच्या तुलनेत एक येन या स्थानिक चलनासाठी सध्या तब्बल ६६ रुपये मोजावे लागत आहेत. वाहन निर्मितीतील अन्य जपानी कंपन्याही किंमतवाढीचा हा कित्ता गिरविण्याची शक्यता आहे.
चलनातील फरकामुळे नफ्यावर होत असलेला परिणाम खरेदीदारांवर सोपविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मारुती सुझुकी इंडियाच्या विपणन आणि विक्री विभागाचे मुख्य कार्याधिकारी मयंक पारीख यांनी सांगितले. मारुती-८०० ते किझाशी या गाडय़ांची निर्मिती मारुती करते. त्यांची विक्री किंमत कमाल १७.५२ लाख रुपये आहे. त्यांच्या किंमती आता १ जानेवारीपासून एक ते दोन टक्क्यांनी वाढणार आहेत.    

अन्य कंपन्यांचीही लगबग
मारुतीने किंमत वाढीचा निर्णय जाहीर केला असतानाच मूळच्या अन्य विदेशी कंपन्यांनीही वाहन दरवाढीचे संकेत दिले आहेत. त्यात प्रामुख्याने जपानी कंपन्या आघाडीवर आहेत. जपानचीच भारतातील भागीदार टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीनेही १ जानेवारीपासून सर्व प्रकारच्या वाहनांवर एक ते दोन टक्के अधिक किंमत लागू करण्याचे संकेत दिले आहेत. होन्डानेही हीच री ओढली आहे. फोक्सव्ॉगन, शेव्‍‌र्हले ब्रॅण्ड असलेली जनरल मोटर्स यांनीही त्यांच्या वाहनांच्या किंमती जानेवारीपासून एक ते तीन टक्क्यांपर्यंत वाढू शकतील, असे म्हटले आहे.