जमावाला रोखण्यासाठी पाण्याचा वापर आणि लाठीमार
दिल्ली सामुहीक बलात्कार प्रकरणाच्या विरोधात हजारो विद्यार्थ्यांनी आज(शनिवार) राष्ट्रपतीभवना बाहेर जोरदार निदर्शनं केली दरम्यान, पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी पाण्याचा व अश्रुधुराचा वापर केला. त्यामुळे घटनास्थळावरील परिस्थिती आणखिन चिघळली गेली व संतापलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतीभवनात घुसण्याचा प्रयत्न केला असता. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला यात अनेकांना दुखापत झाल्याचे वृत्त आहे. तसेच जमावाने पोलिसांच्या वाहनावर देखील दगडफेक केली त्याचबरोबर रागाच्या भरात आपल्या हातातील पाण्याच्या बाटल्या आणि चपला देखील पोलिसांवर फेकल्या. बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासाठी आणि दिल्लीतील महिलांना सरकारकडून देण्यात येणा-या सुरक्षेसाठी आज सकाळी इंडिया गेट आणि रायसीना हिल्स परिसरात हजारो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यामध्ये विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह सुद्धा यावेळी उपस्थित होते.