केवळ मूळ वेतनाच्या प्रमाणात भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा करण्याऐवजी विविध सर्वसाधारण भत्ते एकत्र करून एकूण पगाराच्या प्रमाणात पीएफ जमा करण्याची भविष्य निर्वाह निधी महामंडळाची (ईपीएफओ) योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे.
वाढत्या पगारांनुसार स्वत:वरील पीएफचा भरुदड कमी पडावा, यासाठी कंपन्या मूळ वेतन कमी दाखवून विविध नावांखाली कर्मचाऱ्यांना भत्ते पुरवतात, ही बाब लक्षात आल्यानंतर ईपीएफओने अशा प्रकारचे सर्वसाधारण, नियमित व ठरावीक भत्ते मूळ वेतनाच्या रकमेत समाविष्ट करून त्याआधारे पीएफ ठरवण्याचे आदेश काढले होते. यासंदर्भातील परिपत्रक ३० नोव्हेंबर रोजी काढण्यात आले होते. मात्र, या निर्णयास कंपन्यांनी विरोध केला आहे. परिपत्रकात कंपन्यांविरोधातील तक्रारी सिद्ध करणारे ठोस पुरावे असल्याखेरीज कंपन्यांची चौकशी करता येणार नाही, या सूचनेला कामगार संघटनांनी विरोध केला. या पाश्र्वभूमीवर या परिपत्रकास स्थगिती देण्याचा विचार आहे.