भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी सकाळी १० वाजता बंगळुरू येथे सुरु झाली आहे. भूसंपादन अध्यादेशावरून विरोधकांनी आक्रमक प्रचार सुरू केला असताना त्याला उत्तर देण्याबाबतची रणनीती भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आखली जाणार आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे भाषण होणार की नाही याबाबत अनिश्तितता आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह आणि त्यांच्यानंतर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दिपप्रज्वलन करुन बैठकीचे उदघाटन केले. दहा कोटी सदस्य संख्या केल्याबद्दल पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. अडवाणी बैठकीला मार्गदर्शन करण्यास फारसे उत्सुक नसल्याचे वृत्त आहे. याबाबत पक्ष प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. गोव्यात २०१३ मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अडवाणी सहभागी झाले नव्हते. अमित शहा यांच्याकडे पक्षाची सूत्रे आल्यापासून अडवाणी व इतर ज्येष्ठ नेत्यांना तुलनेने प्रतीकात्मक असलेल्या मार्गदर्शन मंडळात स्थान देण्यात आले.