दिल्ली पोलिसांमधील हवालदार सुभाष तोमर यांचा मृत्यू कसा झाला.. याबाबतचा वाद आता अधिक चिघळताना दिसत आहे. एक प्रत्यक्षदर्शी समोर आला आहे, ज्याचं म्हणणं आहे कि त्याने सुभाष तोमर चालता-चालता अचानक चक्कर येऊन रस्त्यावर पडले होते. तोमर यांना आंदोलनकर्त्यांनी मारहाण केली नव्हती.
दिल्लीमधील सामुदायिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ इंडिया गेट येथ रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चादरम्यान संतप्त जमावाला रोखताना जखमी झालेल्या सुभाष चंद तोमर यांचा मंगळवारी राम मनोहर लोहिया हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. २३ डिसेंबर रोजी टिळख रोडवर ते जखमी अवस्थेत सापडले होते. सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर उसळलेल्या जनप्रक्षोबाला तोमर बळी पडले होते असं समजलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षदर्शी योगेंद्र याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्वत: आणि त्यांच्या एका मैत्रिणीनं मिळून तोमर यांना रूग्णालयात दाखल केलं होतं. आंदोलनादरम्यान योगेंद्र आणि त्यांची मैत्रिण स्वत:ही जखमी झाले होते.     
अचानक समोर आलेल्या नव्या खुलाशानंतर दिल्ली पोलिसांनी तोमर यांच्याबाबतचा दावा फेटाळून लावत त्यांना आंदोलनकर्त्यांनीच मारहाण केली होती आणि याच प्रकरणी आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
पोलिस योगेंद्रच्या खुलाशावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. तसेच पोलिस अधिका-यांचे हेसुध्दा म्हणणे आहे कि सुभाष तोमर यांच्या शरीररावर काही जखमा होत्या.
योगेंद्र यांच्या म्हणण्यानूसार असे लक्षात येते कि तोमर यांचा मृत्यू दगडफेकीने झाला नव्हता. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरी हकीकत समोर येईल.