अमेरिकेने अजूनही आपल्या वंशवादाच्या इतिहासावर मात केलेली नसल्याचे  अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.
साऊथ कॅरोलिनातील ब्लॅक चर्चच्या नऊ सदस्यांची वांशिक विद्वेषातून हत्या केल्याबद्दल एका गोऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केल्यानंतर वंश आणि बंदुका यांच्याबद्दलचा वाद उफाळला आहे. याच मुद्दय़ावर ओबामा यांनी अध्यक्ष म्हणून पहिल्याच मुलाखतीत भर दिला. आपण अद्याप वंशविद्वेषातून मुक्त झालेलो नाहीत आणि सार्वजनिकरीत्या कुणाचा ‘निग्रो’ म्हणून उल्लेख करणे हे केवळ सुसंस्कृत नसल्याचे लक्षण नाही. वंशवाद अजूनही अस्तित्वात आहे किंवा नाही हे ठरवण्याचे ते परिमाणही नाही. हा केवळ उघडपणे पक्षपाताचा मुद्दाही नाही. २०० किंवा ३०० वर्षांपूर्वी जे घडले, ते समाज एका रात्रीत पुसून टाकू शकत नाही, असे ओबामा यांनी लोकप्रिय श्राव्य कार्यक्रम सादर करणारा विनोदवीर मार्क मॅरॉन याला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
गौरवर्णीय माता आणि कृष्णवर्णीय पिता यांच्या पोटी माझा जन्म झाला. तेव्हापासून लोकांचा वंशवादाबद्दलचा दृष्टिकोन बऱ्याच प्रमाणात सुधारला असला, गुलामीचा वारशाची अजूनही आमच्यावर छाया आहे, नव्हे तो अजूनही आमच्या वंशपरंपरागत डीएनएचा भाग आहे, असे ओबामा स्पष्टपणे म्हणाले.
नॅशनल रायफल असोसिएशनची (एनआरए) काँग्रेसवर मजबूत पकड असल्याबद्दल खंत व्यक्त करून ओबामा म्हणाले की, २०१२ साली कनेक्टिकटमधील एका प्राथमिक शाळेत २० मुले आणि ६ शिक्षकांची सामूहिक हत्या करण्यात आल्यानंतरही काँग्रेसने बंदुकीच्या वापरावर नियंत्रण आणू दिले नाही. सहा वर्षांची २० मुले मारली जातात आणि काँग्रेस याबाबतीत अक्षरश: काहीच करत नाही, यामुळे मला अतिशय उबग आला होता.
ओबामा यांच्या जागी दुसरा उमेदवार आणण्यासाठीची मोहीम सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ओबामा म्हणाले, की मी पूर्वीपेक्षा शांत झालो आहे, त्यामुळे पुन्हा निवडणूक लढल्यास मी आणखी चांगला उमेदवार ठरेल. मी काय करतोय ते मला माहीत आहे आणि मी निर्भय आहे.