ओठात सिगरेट शिलगावलेल्या आपल्या छबीची मोहिनी सदैव तरुणांवर घालणारे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी तरुणांनी धूम्रपान करू नये, असे आवाहन केले आहे, तसेच आपली कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचे स्पष्ट केले. आपल्या वाढदिवसाप्रीत्यर्थ शुभेच्छा देण्यासाठी गोळा झालेल्या चाहत्यांशी रजनीकांत यांनी संवाद साधला. आपली तब्येत ढासळण्यास प्रामुख्याने धूम्रपानच कारणीभूत आहे. मात्र प्रयत्न करूनही ही सवय सोडणे आपल्याला शक्य झालेले नाही, अशी प्रांजळ कबुली रजनीकांत यांनी या वेळी दिली.राजकारणात येण्याविषयीच्या सर्व शक्यता फेटाळून लावत तो आपला प्रांत नसल्याचे त्यांनी सांगितले. तामिळी लोकांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल रजनीकांत यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.