सरसंघचालकांचे प्रतिपादन
आगामी सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान राममंदिर उभारणीचा मुद्दा नव्याने उचल खाण्याची चिन्हे आहेत. राममंदिर हा आपल्या देशाच्या अस्मितेचा मुद्दा आहे, असे जोरदार प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी येथे केले. कुंभमेळ्यासाठी अलाहाबाद येथे आले असता त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमीची जागा श्रीराम जन्मभूमी न्यासाकडे सोपविण्यात यावी, अशा आशयाचे विधेयक सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात मांडावे, असा ठराव विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत बुधवारी मंजूर करण्यात आला होता. भागवत यांनी या ठरावाला पाठिंबा घोषित केला. राममंदिर ही भारताची ओळख आहे. या मंदिराची उभारणी म्हणजे जणू आपल्या देशाला स्वत:ची ओळख मिळवून देण्याची एक चळवळच आहे, असे भागवत म्हणाले. दरम्यान, राममंदिर उभारण्याच्या मुद्यावर भाजपही ठाम आहे, असे पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सांगितले.