राष्ट्रपती भवन ही फक्त थोरामोठय़ांची मक्तेदारी राहू नये यासाठी आता तेथील दरबारात दर शनिवारी २०० सामान्य पाहुण्यांना चेंज ऑफ गार्ड समारंभ बघण्याची संधी मिळणार आहे. या समारंभात अतिशय वेगळ्या पद्धतीची वेषभूषा असलेले सैनिक व सजवलेले घोडे सहभागी होत असतात.
राष्ट्रपती भवनात अनेक लष्करी पंरपरा आजही जोपासल्या जातात, त्यात बिगुल, बँड, अश्वारोहण असे अनेक प्रकार आहेत. राष्ट्रपतींचे अंगरक्षक आता नव्या स्मार्ट रूपात सामोरे येणार असून चेंज ऑफ गार्ड संचलन हे पूर्वीच्या नॉर्थ ब्लॉकऐवजी राष्ट्रपती भवनाच्या शाही घुमटाच्या पाश्र्वभूमीवर होईल.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आदेशानुसार चेंज ऑफ गार्ड समारंभातील सर्व र्निबध काढून टाकण्यात आले असून आता २०० सामान्य लोक राष्ट्रपती भवनाच्या हिरवळीवरील दरबारात प्रवेश करून हे संचलन पाहू शकणार आहेत. खरेतर हा भाग जनतेसाठी खुला असला पाहिजे अशी अपेक्षा असूनही तेथे अद्यापपर्यंत कुणाला प्रवेश दिला जात नव्हता, असे राष्ट्रपतींचे प्रसिद्धी सचिव वेणू राजमणी यांनी सांगितले.
थंडीच्या दिवसात हा समारंभ शनिवारी सकाळी दहा वाजता सुरू होईल. साधारण तीस मिनिटांचा हा कार्यक्रम असतो. त्यात जयपूर स्तंभाकडून राष्ट्रपतींचे अंगरक्षक ए.आर.रहमान यांनी रचलेल्या मा तुझे सलामची धून वाजत असताना बाहेर येतात. हा ब्रास बँड सारे जहाँ से अच्छा सारखी इतर गीते सादर करतो. शिवाय भारत माता की जय हा युद्धघोषही करतो. २००७ पासून ही परंपरा चालू आहे. लष्कराच्या बँडवर राष्ट्रगीत वाजवून रिट्रीट ऑफ गार्ड्स होत असते, यात २८ मद्रास बटालियनचे काही जवान सहभागी होत असतात. यात राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचे जे घोडे असतात, त्यांची तालासुरात पडणारी पावले हे वैशिष्टय़ असते. रायसीना हीलवर ही नजाकत अनुभवता येणे ही खरोखर पर्वणी असते.