समाजावादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या दादरी भेटीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार साक्षी महाराज यांनी वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. खाटीकांपासून गोमातेला वाचविण्यासाठी मी कोणालाही मारायला तयार आहे. कुणी आमच्या आईला मारण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. वेळ पडल्यास गोमातेच्या
रक्षणासाठी मी कोणालाही मारायला आणि मरायलाही तयार असल्याचे साक्षी महाराजांनी म्हटले आहे.

नक्की वाचा :- बिहारचा सत्ताबाजार : तर बिहारमध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा

 

साक्षी महाराजांनी यावेळी आझम खान यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. आझम खान पाकिस्तानी असून त्यांना पाकिस्तानी शक्तींवर जास्त विश्वास आहे. ते भारतमातेला चेटकीण म्हणून संबोधतात, असेही साक्षी महाराजांनी यावेळी सांगितले. गोवंश हत्येच्या प्रश्नावर उत्तर प्रदेश सरकारची भूमिका दुटप्पी आहे.

सरकारकडून दादरीतील हत्याप्रकरणाचे करण्यात येणारे राजकारण निषेधार्ह असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकारानंतर महमंद अखलाखच्या कुटुंबियांना अखिलेश यादवांनी ४५ लाखांची नुकसान भरपाई जाहीर केली. माझा या गोष्टीला कोणताही आक्षेप नाही.

मात्र, जेव्हा उन्नावमध्ये दोन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या झाली, तेव्हा अखिलेश सरकारने त्यांच्या कुटुंबाला कोणतीही नुकसान भरपाई का दिली नाही, असा सवाल साक्षी महाराजांनी उपस्थित केला.