पोलिसांच्या छळाने संशयिताच्या मृत्यूचा आरोप

उत्तर प्रदेशात दादरी येथे गोमांस बाळगल्याच्या कथित संशयावरून एका मुस्लीम व्यक्तीची जमावाने दगडाने ठेचून हत्या केल्याच्या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल पाठवला आहे. काल रात्री प्रत्यक्ष तथ्यांवर आधारित अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आल्याची माहिती गृह खात्याच्या प्रवक्त्याने दिली. या अहवालातील तपशिलाबाबत काही सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे. नंतरच्या वृत्तानुसार मांस भक्षण, गोहत्या याबाबतच्या अफवा पसरल्याने ही घटना घडल्याचा उल्लेख या अहवालात नाही. दरम्यान, या प्रकरणातील गुन्हय़ात नाव नसलेल्या जय प्रकाश (वय २४) याचा मृतदेह या खेडय़ात सापडला असून, पोलिसांच्या छळवणुकीनेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. २८ सप्टेंबर रोजी इकलाख यांची जमावाने हत्या केली होती. त्यानंतर पोलीस जयप्रकाश याचा शोध घेत होते असे गावकऱ्यांनीही सांगितले आहे.
जमावाने एका मुस्लीम व्यक्तीला ठार केले होते. त्याबाबत जे काही घडले ते या अहवालात आहे असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेत इकलाख या पन्नास वर्षांच्या व्यक्तीला घरात गायीचे मांस ठेवल्याच्या संशयावरून दोनशे जणांच्या जमावाने बाहेर ओढून ठार केले. त्या आधी स्थानिक मंदिरात या कुटुंबाने वासरू मारून त्याचे मांस खाल्ल्याची माहिती देण्यात आली होती नंतर जमाव बिशदा येथे या व्यक्तीच्या घरावर चाल करून गेला. त्यात दोनशे जण सामील होते. दरम्यान, मुख्य सचिव (गृह) देवाशिष पांडा व पोलीस महासंचालक जगमोहन यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. १ ऑक्टोबरला केंद्रीय गृह मंत्रालयाने दादरी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारकडे अहवाल मागितला होता व राज्य सरकारला अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काळजी घेण्याचा आदेश दिला होता. धार्मिक भावना भडकावून सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्राने राज्यांना दिले आहे.