राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांसाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना साकडे घातले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे सहकारी लोजप व ‘हम’ पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात स्थानिक भाजप कार्यकर्ते उत्साह दाखवत नसल्याने या पक्षाच्या नेत्यांनी शहा यांच्याकडे रडगाणे गायले आहे. मोदी यांची सभा झाल्यास स्थानिक भाजप कार्यकर्ते सक्रिय होतील, त्याचा फायदा रालोआस होईल, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी शहा यांच्याकडे विनवणी केली आहे.
लोजपच्या वाटय़ाला आलेल्या ४० मतदारसंघांत तीन सभा पंतप्रधान मोदी यांनी घ्यावात, अशी विनंती पासवान यांनी अमित शहा यांना केली. बिहारमध्ये मोदी वीस सभा घेणार आहेत. जवळ-जवळ १६० मतदारसंघ व्यापणाऱ्या मोदींच्या सभेमुळे रालोआत भाजपचे पारडे जड होत आहे.
पासवान यांच्याऐवजी त्यांचे खासदार पुत्र चिराग यांनी जागावाटपात मोठी भूमिका बजावली. उमेदवारी वाटपात झालेला गोंधळ निस्तरण्यासाठी पासवान यांनी आता मोदींना मदत मागितली आहे.