महिलांवरील बलात्काराच्या घटना ‘इंडिया’मध्येच जास्त होतात, भारतात नव्हे, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानामुळे संघ आणि भाजपची शुक्रवारी चांगलीच पंचाईत झाली. सरसंघचालकांच्या वक्तव्यामागची ‘भावना’ समजावून सांगताना भाजप व संघाच्या नेत्यांना संस्कृती, परंपरा व मूल्यांचा आधार घ्यावा लागला, तर दुसरीकडे भागवत यांच्या विधानाचा महिला नेत्या व विरोधी पक्षांनी तिखट समाचार घेतला.
भागवत‘पुराण’
महिलांवरील बलात्काराच्या घटना इंडियामध्ये जास्त होतात, भारतात नव्हे, असे वादग्रस्त विधान आसाममधील सिल्चर येथे बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.  शहरांमध्ये राहणाऱ्या महिला पाश्चिमात्य जीवनशैलीचा पुरस्कार करीत असल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हे घडतात, असा दावाही भागवत यांनी केला.
भाजपचा बचाव
सरसंघचालकांनी केलेले विधान भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांविषयी होते आणि त्याच व्यापक दृष्टिकोनातून त्याकडे बघितले पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सरसंघचालकांच्या वादग्रस्त विधानाचा बचाव केला. ते म्हणाले की, महिलांच्या सन्मानाला गौरवाचे स्थान असलेल्या भारताच्या संस्कार आणि मूल्यांविषयी सरसंघचालक बोलत होते. महिलांचा सन्मान हा संघाच्या विचारधारेचा केंद्रबिंदू आहे. सरसंघचालकांच्या विधानाकडे समग्रतेने पाहणे उचित ठरेल, असे संघाचे प्रवक्ते राम माधव म्हणाले.