भारतीय हवाईदलातील सुखोई -३० या लढाऊ विमानाच्या अपघातासाठी कोणतीही तांत्रिक चूक कारणीभूत नसून, वैमानिकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे रशियाकडून स्पष्ट करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात पुण्यानजीक कोलवडी गावातील एका उसाच्या शेतात लष्कराचे सुखोई ३० हे रशियन बनावटीचे लढाऊ विमान कोसळले होते. विमान उतरताना कुठल्याही संदेशाशिवाय या विमानाचे सीट बाहेर आल्याने हा अपघात घडल्याचा दावा वैमानिकांकडून करण्यात आला. त्यानंतर विमानाच्या ‘फ्लाय बाय वायर सिस्टम’ मध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा प्राथमिक अंदाज हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. या अपघाताची गंभीर दखल घेत हवाई दलाने लढाऊ विमानांच्या ताफ्यातील एक तृतीयांश विमानांची उड्डाणे तात्पुरती थांबविण्यात आली होती. दरम्यान, अपघाताच्या कारणांचा तपास करण्यासाठी रशियातील दहा तज्ज्ञांचे पथक पुण्यात दाखल झाले होते. मात्र, चौकशीअंती हा अपघात मानवी चुकीमुळेच झाल्याची माहिती रशियाचे राजदूत अलेक्झांडर कदाकिन यांनी पत्रकार परीषदेत दिली. भारतीय हवाईदलात उत्कृष्ट दर्जाचे वैमानिक असले तरी त्यांच्यापैकी काहीजण नवखे असल्याने जोशात त्यांच्याकडून चुका घडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. या विमान अपघातातील एक वैमानिक सुखोई-३० च्या दुसऱ्या अपघाताच्या वेळीही सहभागी होता. २००९ नंतर सुखोई ३० विमानाला पुण्याजवळ पाचवा अपघात झाला होता.