जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने भ्याड हल्ला करून दोन सैनिकांची हत्या करण्याची घटना अद्याप ताजी आहे. याबाबत भारतीय जनतेमधील व सैन्यांमधील रागही अजून पुरेसा शमलेला नाही. मात्र तरीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती आता बरीच सुधारली आहे, असे प्रशस्तिपत्रक केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी सोमवारी दिले.
या प्रकरणावरून उडालेला धुराळा काही दिवसांत खाली बसेल. या प्रकरणी जबाबदारीने पावले उचलणे आवश्यक आहे, असेही खुर्शीद यांनी सांगितले.
भारतीय सैन्याच्या हत्येवर पाकिस्तानचे उच्चायुक्त सलमान बशीर यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना खुर्शिद यांनी हा सामंजस्यचा राग आळवला. भारतीय सैन्याच्या हत्येमध्ये पाकिस्तानी लष्कराचा हात नसल्याचा दावा बशीर यांनी केला होता. देशांतर्गत परिस्थितीचा विचार करून केलेल्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यता नाही, असे खुर्शिद यांनी सांगितले.
भारताबरोबर चर्चा करण्याचा पाक परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांचा प्रस्ताव हा मुत्सद्दी माध्यमातून नव्हे तर प्रसिद्धी माध्यमांमार्फत आला आहे, त्यामुळे हा प्रस्ताव अधिकृत मानता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतेही पाऊल पुढे उचलण्यापूर्वी वर्तमान परिस्थितीचा गांभीर्याने अभ्यास करणे आवश्यक आहे. या प्रकरणी तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाऐवजी द्विपक्षीय चर्चेला प्राधान्य देण्याची भारताची भूमिका आहे. नियंत्रण रेषेवर सध्या शांतता आहे, या प्रकरणी भारत सरकार सैन्य अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.