लाहोर रेल्वे स्थानक आणि पंजाब प्रांतातील हॉटेलमध्ये तीन दिवस काढल्यानंतर जवळपास ८६ भारतीय प्रवासी वाघा सीमेवरून पायपीट करीत आपल्या घराकडे निघाले आहेत.

जवळपास २०० जण समझोता एक्स्प्रेसने गेल्या गुरुवारी भारतात जात होते तेव्हा त्यांना भारतीय अधिकाऱ्यांनी वाघा सीमेवर थांबविले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे कारण देऊन धोका असल्याचे या प्रवाशांना सांगण्यात आले.

त्यानंतर समझोता एक्स्प्रेस पुन्हा लाहोर रेल्वे स्थानकावर आली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांची लाहोर स्थानक आणि जवळच्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. पाकिस्तानातील प्रवासी त्यांच्या घराकडे निघून गेले.

त्यानंतर समझोता एक्स्प्रेस सोमवारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे कारण देऊन रद्द करण्यात आली. भारतीय प्रवाशांना भूमार्गाने त्यांच्या घराकडे पाठविण्यात येईल, असे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री साद रफिक यांनी सांगितले. मात्र भारतीय अधिकाऱ्यांनी सोमवारी पुन्हा एकदा समझोता एक्स्प्रेसला भारतीय हद्दीत येण्याची परवानगी देण्यास नकार दिला. त्यामुळे प्रवाशांना भूमार्गाने वाघा सीमेवर पाठविण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता, असे रेल्वे प्रवक्त्याने सांगितले.