राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून फारकत घेणाऱ्या पी. ए. संगमा यांनी शनिवारी नव्या पक्षाची स्थापना केली. नॅशनल पीपल्स पार्टी असे त्यांच्या पक्षाचे नाव असून आपला पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देईल, असे संगमा यांनी घोषित केले. त्यासाठी त्यांनी पुस्तक हे निवडणूक चिन्ह निवडले आहे.
लोकसभेचे माजी सभापती असणाऱ्या संगमा यांनी गेल्या वर्षी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत ते प्रणब मुखर्जी यांच्याकडून पराभूत झाले होते. केंद्रात मंत्री असणाऱ्या अगाथा संगमा यांनी या निवडणुकीत आपल्या वडिलांचा प्रचार केल्याने त्यांना मंत्रिपद सोडण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. संगमा आणि राष्ट्रवादीत त्यापूर्वीच ताणल्या गेलेल्या संबंधांना या घडामोडींमुळे पूर्णविराम मिळाला. या पाश्र्वभूमीवर संगमा यांनी नवा पक्ष काढला असून लवकरच होणाऱ्या मेघालय विधानसभेच्या निवडणुकीत ते पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत. या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे ३३ उमेदवार निश्चित झाले आहेत, आमचा पक्ष नवा नसून मणिपूरमध्ये तो पूर्वीपासून कार्यरत आहे, आदिवासींना केंद्रबिंदू मानून या पक्षाचे देशभर कार्य चालेल. देशातील मागासलेला समाज जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत त्याची प्रगती होणे कठीण आहे म्हणूनच या पक्षाचे चिन्ह पुस्तक ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.