पोलिसांना हटवा मग आमचे शक्तिप्रदर्शन बघा, अशी भाषा बोलणारे एआयएमआयएमचे नेते असासुद्दीन ओवैसी नमाज अदा करताना पोलीस संरक्षण मागतात. अशा माफिया, गुंड व कट्टर विचारसरणीच्या पक्षासमवेत बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत युती करणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिले. युतीचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून दिला गेला नाही. ही निव्वळ अफवा आहे. धार्मिक कट्टरता असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, भाजप हे पक्ष व एआयएमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका निरुपम यांनी केली. एआयएमआयएमसमवेत संभाव्य युतीवर आपण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना भेटलो नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.  निरुपम यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भेटल्याचे सांगितले.
दरम्यान, संजय निरुपम यांची शिवसेनेतील ‘फॅसिस्ट’ मनोवृत्ती कायम आहे. नमाज अदा करणे हा आमचा घटनात्मक हक्क आहे. पोलीस संरक्षण असले अथवा नसले तरी आम्ही नमाज अदा करू असे एआयएमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.