अभिनेता सलमान खानला सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालायने स्थगिती दिल्यानंतर या देशात गरिबांना न्याय मिळत नाही हे सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी शुक्रवारी दिली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सत्यपाल सिंग म्हणाले, सलमान खानविरोधातील हिट अॅंड रन प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यावर देशातील न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाटू लागला होता. मात्र, आजच्या निर्णयानंतर या देशातील गरिबांना न्याय मिळत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. श्रीमंत लोक कोणत्या एका न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याच्या तयारीत नसतात. पैशांच्या जोरावर ते उच्च न्यायालयात जातात. तिथेही आपल्या बाजूने निकाल लागला नाही, तर सर्वोच्च न्यायालयात जातात. बचाव पक्षाचे वकीलही त्यांना मदत करतात. त्यामुळेच गरिबांना न्यायाची वाटच बघावी लागते, असे त्यांनी सांगितले.