आर्यलडमधील दंतवैद्यक असलेल्या सविता हलप्पनवर हिने अनेकदा गर्भपाताची परवानगी मागितली असूनही ती नाकारण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला होता. तिच्या गर्भपाताबाबत करण्यात आलेल्या विनंत्यांचा उल्लेख आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या वैद्यकीय नोंदीत नाही. केवळ चहा व टोस्टची मागणी केली, असल्या फुटकळ बाबींच्या नोंदी त्यात आहेत, असे तिचे पती प्रवीण हलप्पनवर यांनी म्हटले आहे.
सविताचा २८ ऑक्टोबरला गालवे युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या नोंदींमध्ये चहा-टोस्टची मागणी, जादा ब्लँकेटची मागणी अशा अनेक बाबींचा समावेश आहे पण आम्ही सविताचा गर्भपात आवश्यक असून तो करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी याबाबत ज्या विनंत्या केल्या होत्या त्यांचा समावेश नाही.
सविताच्या प्रकरणातील सर्व वैद्यकीय नोंदी प्रवीण यांना उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यात सोमवार २२ ऑक्टोबरची नोंद नाही. त्या दिवशी पहिल्यांदा गर्भपाताच्या परवानगीची मागणी केली होती. २३ ऑक्टोबरच्या नोंदीतही त्याचा उल्लेख नाही. प्रवीणने सांगितले की, ज्या पद्धतीने ही माहिती लपवण्यात आली ती बघता आर्यलडच्या आरोग्य व सुरक्षा अधिकाऱ्यांवरचा आपला विश्वास उडाला आहे. आमचा या व्यवस्थेवर विश्वास नाही व त्यामुळेच आम्हाला त्यांच्याकडून या प्रकरणी केली जाणारी चौकशी नको आहे, तर सार्वजनिक चौकशी हवी आहे. आर्यलडचे अध्यक्ष मायकेल डी हिगिन्स यांनी सांगितले की, सविताच्या मृत्यूच्या चौकशीत तिच्या कुटुंबीयांचे तसेच सरकारचेही समाधान झाले पाहिजे.