नासाच्या न्यू होराझन्स या अंतराळयानाने प्लुटोच्या दूरच्या बाजूकडील चार गूढ व गर्द ठिपक्यांचे छायाचित्र टिपले आहे. हे यानाने टिपलेले शेवटचे व सवरेत्कृष्ट छायाचित्र आहे असे सांगण्यात आले.
बटू ग्रह असलेल्या प्लुटोजवळून हे यान गेले. प्लुटोवरील ठिपके हे नेहमी त्याचा सर्वात मोठा चंद्र श्ॉरॉनच्या दिशेने असतात. हे यान १४ जुलैला या ग्रहाच्या आणखी जवळून जाणार असले तरी तेव्हा प्लुटोची ती बाजू न्यू होरायझन्स यानासमोर येणार नाही.
न्यू होरायझन्सचे प्रमुख संशोधक अ‍ॅलन स्टर्न यांनी सांगितले की, गेल्या काही दशकांत प्लुटोच्या आतापर्यंत समोर न आलेल्या बाजूचे हे सर्वात चांगले व शेवटचे छायाचित्र आहे. प्लुटोवरचे चार ठिपके हे गडद पट्टय़ात असून हा पट्टा प्लुटोच्या विषुववृत्तीय भागात प्रदक्षिणा करतो. ते सर्व ठिपके सारख्या आकाराचे आहेत व सारख्या अंतरावर आहेत हे वैज्ञानिकांना न उकलेले गूढ आहे. न्यू होरायझन्सचे वैज्ञानिक कर्ट नीबर यांनी सांगितले की, हे ठिपके म्हणजे गोंधळात टाकणारे कोडे आहे, ते ठिपके म्हणजे पठारे आहेत की, मैदाने आहेत हे समजू शकत नाही. त्यांचा प्रखरपणा कमी जास्त होतो.
प्लुटोवरील हे मोठे गडद ठिपके ४८० किलोमीटर व्यासाचे असून त्यांचा आकार मिसुरी राज्याइतका आहे. अगोदरच्या छायाचित्रांशी तुलना करताना हे ठिपके आताच्या छायाचित्रात जास्त गुंतागुंतीचे आहेत. या ठिपक्यांची किनार व इतर प्रकाशित भाग यांच्यातील फरक दिसून येत आहे. या छायाचित्रावरून केवळ या ठिपक्यांचा अभ्यास शक्य आहे असे नाही तर प्लुटोचे भूगर्भशास्त्र, भूभौतिकी यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
या प्लुटो ग्रहावर काही विवरे असून ती छोटे पदार्थ त्याच्यावर आदळून तयार झालेली आहेत. आम्ही जेव्हा सर्व प्रतिमा एकत्र करून पाहू, रंगांवर आधारित माहिती गोळा करून पाहू त्यामुळे प्लुटोचा इतिहास समजू शकेल, असे नासाच्या अ‍ॅमेस संशोधन केंद्राचे जेफ मूर यांनी सांगितले. न्यू होरायझन्स यान प्लुटोच्या आणखी जवळून १४ जुलैला जाणार आहे त्यावेळी त्याचे बटुग्रहापासूनचे अंतर १२५०० कि.मी आहे. त्यावेळी प्लुटोवर असलेल्या हृदयासारख्या आकाराचे अवलोकन केले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या हृदयासारख्या आकाराबाबत माणासाच्या कल्पनाशक्तीला आव्हान दिले आहे.

प्लुटो- बटू ग्रह

१)चार ठिपक्यांचे छायाचित्र टिपण्यात यश. एका ठिपक्याचा व्यास ४८० किलोमीटर
२)न्यू होरायझन्स यान १४ जुलैस आणखी जवळून जाणार
३) १४ जुलैला यान १२५०० कि.मी अंतरावरून प्लुटोवरील हृदयासारख्या भागाचे अवलोकन करणार
४) प्लुटोची भूभौतिक, भूगर्भशास्त्रीय, भूभौतिक रचना समजण्यास मदत