एकाच मोहिमेत सातत्याने सर्वाधिक दिवस अंतराळात वास्तव्य करण्याचा अमेरिकी विक्रम करण्याचे नासाचे अंतराळ मोहीम कमांडर स्कॉट केली यांनी ठरविले आहे. ते व त्यांचे रशियन सहकारी अंतराळवीर मिखाईल कोरनेन्को हे रशियाच्या सोयूझ अंतराळयानाने कझाकस्थानातील बैकानूर अवकाशतळावरून २०१५ मध्ये अंतराळात झेपावणार आहेत व त्यानंतर २०१६ मध्ये परत येणार आहेत.
आपल्या सौरमालेतील आगामी शोध मोहिमांविषयीची वैज्ञानिक माहिती गोळा करणे हा त्यांच्या मोहिमेचा मुख्य हेतू असणार आहे. मानवी शरीर अवकाशातील परिस्थितीशी कसे जुळवून घेते किंवा त्यावर काही परिणाम होतात किंवा नाही याचा अभ्यास यात केला जाणार आहे. बारा महिने ही अंतराळ मोहीम चालणार असून त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे संपूर्ण चमूची कामगिरी व आरोग्य तसेच आगामी योजनातील जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना करता येणार आहेत. नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या प्रयत्नात असून लघुग्रह व मंगळ या मोहिमाही हाती घेतल्या जाणार आहेत.
नासा मुख्यालयातील संशोधन मोहिमांविषयक सहायक प्रशासक विल्यम गेरस्टेनमायर यांनी सांगितले की, या दोघांची कौशल्ये व पूर्वानुभव यांचा वापर हा दीर्घकालीन मोहिमांची आखणी करण्यासाठी होणार आहे. त्यात सूक्ष्म गुरुत्वाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम तपासला जाणार आहे. कारण यात काही अवकाश मोहिमा या पृथ्वीपासूनच्या निकटच्या कक्षेतील असणार आहेत.
रशियाच्या फेडरल स्पेस एजन्सीचे प्रमुख व्लादिमीर पोपोवकिन यांनी सांगितले की, एक वर्षांच्या मोहिमेसाठी उमेदवाराची निवड करणे खरोखर अवघड होते कारण अनेक उमेदवार हे त्यासाठी सक्षम होते. त्यातही आम्ही अधिक जबाबदार, कौशल्य असलेले व उत्साही अंतराळवीर निवडले आहेत, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
केली व कोरनिन्को यांचे दोन वर्षांचे प्रशिक्षण अमेरिका, रशिया व इतर भागीदार देशांमध्ये पुढील वर्षी सुरू होत आहे.