वेगळ्या तेलंगणासाठी आता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मैदानात उतरले आहेत. वेगळ्या तेलंगणाचा निर्णय लवकर घ्या, अन्यथा त्याची फळे भोगावी लागतील, अशा शब्दांत आपली भूमिका पवार यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे व्यक्त केली.
यूपीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदाच तेलंगणासंदर्भात जाहीर भूमिका घेतली. त्यांनी वेगळ्या तेलंगणाला आपला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात लवकरच यूपीएच्या घटक पक्षांची बैठक होईल, असेही त्यांनी सूचित केले.
कॉंग्रेस पक्षाचेही वेगळ्या तेलंगणाला समर्थन असल्याचे पवार यांनी पत्रकारांना सांगितले. आता फक्त केंद्र सरकार आपला निर्णय कधी जाहीर करते, एवढीच वाट बघावी लागेल. हा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.