विविध महामंडळावरून केजेपीच्या पाठीराख्यांना वगळण्याच्या मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या धोरणामुळे संतप्त झालेल्या येडियुरप्पा यांनी राज्यातील भाजप सरकारवर हल्लाबोल करताना या पक्षाच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस घटत असून पुढील वर्षी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार त्यामुळे त्यांनी गमावला आहे, असे सूतोवाच केले.
राज्यातील जगदीश शेट्टर यांच्या सरकारचे बहुमत दिवसेंदिवस लक्षणीयरीत्या घटत आहे. त्यामुळे पुढील वर्षांचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार या सरकारने गमावला आहे, असे येडियुरप्पा यांनी रविवारी येथे पत्रकारांना सांगितले.
राज्यातील भाजपच्या सरकारने उत्तर कनार्टकातील अनेक महामंडळांवरून कर्नाटक जनता पार्टीच्या उमेदवारांना वगळले आहे व या प्रांतासाठी काहीही करताना ते दिसत नाही, त्यामुळे हे सरकार विसर्जित करण्यात यावे, अशीच तेथील जनतेची इच्छा आहे.
गेल्या वर्षी डी. व्ही. सदानंद गौडा हे अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत असताना येडियुरप्पा यांनी जवळपास ६० आमदारांना एका रिसॉर्टवर नेऊन त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. लिंगायत समाजाच्या या कडव्या नेत्याने मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर लगोलग आपले पाऊल मागे घेतले होते.
दरम्यान, ४ जानेवारी रोजी शेट्टर सरकार सत्तेवर राहणार की नाही याबाबत येडियुरप्पा गौप्यस्फोट करणार आहे, याबद्दल भाजप नेते अनंत कुमार यांना छेडले असता प्रसारमाध्यमांनीच उठवलेली ही आरोळी आहे, असे मत व्यक्त केले. त्यावर महिनाभरापूर्वी पक्षत्याग करून नवा पक्ष काढणाऱ्या येडियुरप्पा यांनी माजी केंद्रीय मंत्र्यांना आता पुढील महिन्यातच याबाबत खरे काय ते कळेल, असे सांगितले.