महिलेवर बलात्कारप्रकरणी अटकेत असलेला उबर कॅबचालक या प्रकरणात निदरेष असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी दिल्ली न्यायालयात केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीत विसंगती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आरोपी चालक शिवकुमार यादव याच्या वकिलांनी महिला खोटे बोलत असून या प्रकरणी न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे म्हटले आहे. महिलेने सादर केलेल्या कागदपत्रात पोलीस घटनास्थळी ५-१० मिनिटांत पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास एका तासापेक्षाही अधिक कालावधी लागला, अशी माहिती यादवचे वकील डीके शर्मा यांनी दिली आहे. जर महिलेला चालकाचे नाव ठाऊक होते, तर तिने पोलिसांना का सांगितले नाही? असा सवालही आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला आहे. प्राथमिक गुन्हा दाखल करताना चुकीच्या व्यक्तीचे नाव दिल्याचे महिलेने सांगितले आहे. मात्र तिच्या मित्राला चालकाचे नाव ठाऊक असताना तिने त्याच्याशी संपर्क का साधला नाही? असा सवालही वकिलांनी उपस्थित केला.