उत्तर प्रदेशातील दादरीमध्ये घडलेल्या घटनेवरून समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी थेट संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार टीका केली. आझम खान यांनी देशद्रोह केला असून, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी आणि निवडणूक आयोगाने त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखामधून करण्यात आली आहे. हा विषय सोशल मीडियावर बुधवारी सकाळपासून चर्चेत असून, त्यामुळे शिवसेना हा शब्द भारतात ट्रेंडिंगमध्ये आहे.
शिवसेनेच्या नेहमीच्या शैलीत अत्यंत जहाल शब्दांत आझम खान यांच्यावर अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. भारतातील एक घटना संयुक्त राष्ट्रसंघाकडे नेऊन देशाची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचे काम आझम खान यांनी केले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. आझम खान यांना देशातील कुठल्याही घटानात्मक पदावर राहण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोगाने त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी करीत त्यांनी देशद्रोह केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्मिरमध्ये हिंदूंना चिरडले जाते. हिंदूंच्या या अवस्थेबद्दल संयुक्त राष्ट्रसंघास पत्र लिहून आवाज उठवावा, असे आझम खान यांना का वाटले नाही, असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.
भाजप सरकारला प्रशस्तीपत्र
दरम्यान, अग्रलेखातून केंद्रातील भाजप सरकारची पाठराखण करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदूत्त्वावादी म्हणून भाजप सरकारला झोडपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. भाजप सरकार शत-प्रतिशत निधर्मी म्हणूनच कारभार करीत आहे, असे प्रशस्तीपत्रही देण्यात आले आहे.