नासा-हनीबी रोबोटिक्सचा करार
आपल्या पृथ्वीच्या भोवती अनेक लघुग्रह फिरत आहेत. त्यातील एखादा जरी मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तरी धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी क्षेपणास्त्राने त्याची दिशा बदलणे किंवा त्याचे तुकडे करणे अशा अनेक कल्पना आतापर्यंत मांडल्या गेल्या आहेत. या लघुग्रहांवर यान उतरवण्याच्याही कल्पना मांडल्या गेल्या. त्यामुळे तेथे खाणकाम करून खनिजे मिळवणेही शक्य आहे, पण त्यासाठी तो लघुग्रह किती दणकट आहे हे बघण्यासाठी नासाने ब्रुकलिनच्या एका कंपनीबरोबर करार केला आहे. यात अवकाशात चालवता येणारी शॉटगन तयार केली जाणार आहे. तिच्या मदतीने तो लघुग्रह नमुने घेण्यास किंवा खाणकाम करण्यास योग्य आहे की नाही हे ठरवता येणार आहे. शिवाय तो पृथ्वीवर आदळणार असेल तर त्याची कक्षा बदलून टाकता येणार आहे.
ही बंदूक हनीबी रोबोटिक्स ही ब्रुकलिन नेव्ही यार्ड येथील कंपनी नासाच्या अ‍ॅस्टेरॉईड रिडायरेक्शन प्रकल्पांतर्गत तयार करीत आहे. या बंदुकीच्या मदतीने लघुग्रहाला तो पृथ्वीवर आदळण्याच्या स्थितीत असेल तर चंद्राच्या कक्षेत ढकलता येणार आहे. मंगळावर जाण्याची मोहीम राबवली जाईल तेव्हा एवढय़ा मोठय़ा अंतरात अवकाशवीरांना एक थांबा असावा म्हणूनही लघुग्रहाचा वापर करता येणार आहे, त्यामुळे त्याचे नमुने घेणेही या बंदुकीच्या मदतीने शक्य होणार आहे. ती मंगळ मोहिमेची पूर्वतयारी आहे. ही बंदूक लघुग्रहाचे मोठे तुकडे उडवेल व त्याला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत नेईल. त्यामुळे या लघुग्रहांचे संशोधन करणे वैज्ञानिकांना सोपे जाईल. लघुग्रह म्हणजे अंतराळातील फिरणारा खडक कितपत दणकट आहे हे त्याच्यावर बंदुकीतून गोळी झाडून समजणार आहे. लघुग्रहांचे नमुने गोळा करणेही त्यामुळे शक्य होणार आहे, असे हनीबी रोबोटिक्सच्या एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीजचे क्रिस झ्ॉकने यांनी सांगितले.

उपयोग
’लघुग्रहाचा मजबूतपणा तपासणे
’लघुग्रहाचे तुकडे नमुन्याच्या स्वरूपात मिळवणे
’लघुग्रहाला चंद्राच्या कक्षेत ढकलणे
’मंगळ मोहिमेच्या दृष्टिकोनातून लघुग्रहाचा थांबा म्हणून वापर करण्यासाठी अनुकूलता तपासणे