केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्यास मला ‘राष्ट्रीय तपास संस्थे’(एनआयए)च्या अधिकाऱ्याने सांगितल्याचा आरोप या खटल्यातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड. रोहिणी सालियन यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत आणि नंतर पत्रकार परिषदेत गुरुवारी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद दिल्लीतील राजकीय वर्तुळात उमटले. ‘एनआयए’ने तात्काळ दोन पानी पत्रक काढून सालियन यांचे आरोप फेटाळले. काँग्रेसने मात्र आक्रमक भूमिका घेत या संस्थेच्या प्रमुखांना पदावरून दूर करावे व न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी केली.
मालेगावात २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हिंदू अतिरेक्यांचा हात असल्याचा आरोप आहे. सालियन म्हणाल्या की, ‘एनआयए’च्या एका अधिकाऱ्याने प्रथम मला दूरध्वनी केला. त्यानंतर त्याने मला भेटायची इच्छा व्यक्त केली. प्रत्यक्ष भेटीत, या खटल्यातील आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्याची सूचना त्याने मला केली. मला अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून मिळाल्याचेही त्याने सांगितले.
त्यानंतर या वर्षी १२ जूनला मला हाच अधिकारी पुन्हा भेटला. या खटल्यातून मला तसेच अन्य काही वकिलांना वगळले जाणार असल्याचे त्याने मला सांगितले. त्यावर माझे सेवाशुल्क द्यावे आणि मला या खटल्यातून मुक्त केल्याचे लेखी आदेश द्यावेत, असे मी त्याला सांगितले. आजवर मात्र ना मला माझे सेवाशुल्क दिले गेले आहे ना लेखी आदेश मिळाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सालियन यांच्या आरोपांनंतर दिल्लीत राजकीय हादरे बसले. ‘एनआयए’ने तातडीने दोन पानी पत्रक काढून सालियन यांचे आरोप फेटाळले. आमचा एकही अधिकारी सालियन यांना या प्रकारे भेटलेला नाही आणि त्यांचे हे आरोप या खटल्यात अडथळे आणणारेच आहेत, असेही ‘एनआयए’ने नमूद केले. अर्थात या खटल्यातून सालियन यांच्यासह तीन विशेष सरकारी वकिलांना बदलण्याची विनंती आमच्या मुंबई कार्यालयाने १६ जूनला केली आहे, त्यावर अद्याप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
काँग्रेसची टीका
सालियन यांच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने ही अघोषित आणीबाणीच असल्याची टीका मोदी सरकारवर केली आहे. पक्ष प्रवक्ते अजय माकन म्हणाले की, मालेगावचा तपास आता सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच केला जावा. सध्याच्या सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील या तपास संस्थेवर आमचा विश्वास उरलेला नाही.