मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलताच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या चर्चेत आले आहे. मोदी यांच्यात देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात यावी, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. मोदी यांच्या उमेदवारीवर जनता दल युनायटेडला आक्षेप असेल तर जदयुने रालोआतून बाहेर व्हावे, असेही विधान सिन्हा यांनी केले आहे. सिन्हा यांच्या विधानामुळे भाजप-रालोआत तणाव निर्माण झाला आहे.
यशवंत सिन्हा यांनी केलेल्या विधानाला रविवारी भाजपचे नवे अध्यक्ष राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झालेल्या दीर्घ चर्चेच्या पाश्र्वभूमीशी जोडून पाहिले जात आहे. भाजपमध्ये सिन्हा यांना कोणतेही मोठे पद नसले तरी पक्षात वेगळे सूर आळविण्यासाठी अलीकडच्या काळात त्यांचा वापर केला जात आहे.  
 लोकसभा निवडणुकीच्या आधीच भाजपने मोदी यांच्या उमेदवारीची घोषणा करावी. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत मोठा फायदा होईल, असा तर्क सिन्हा यांनी दिला आहे. जदयुला हा प्रस्ताव पटत नसेल तर त्यांनी रालोआतून चालते व्हावे, अशी आक्रमक भूमिका सिन्हा यांनी घेतली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्याही गोटातून मोदी यांच्या नावाला पाठिंबा दिला जात असल्याची माहिती आहे. पंतप्रधानपदासाठी मोदी यांचे नाव पुढे करायचे आणि ते रालोआतील घटक पक्ष विशेषत जदयुकडून हमखास फेटाळले गेल्याने लोकसभा निवडणुकीच्या वेळी मागे पडेल, अशीही मोदींचे नाव पुढे करण्यामागची रणनिती असल्याचे म्हटले जात आहे.
जदयु नाराज
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न सुरू झाल्यामुळे जनता दल (युनायटेड) कमालीचा संतप्त झाला असून अत्यंत कठीण परिस्थितीत आघाडय़ा स्थापन केल्या जातात, याचे भान भाजपसारख्या विरोधी पक्षाने ठेवले पाहिजे, अशा कानपिचक्या पक्षाचे प्रमुख शरद यादव यांनी सोमवारी दिल्या. आघाडय़ांच्या संदर्भात यशवंत सिन्हा यांचे हे वक्तव्य फारच अस्थानी ठरते, असे मत यादव यांनी व्यक्त केले. सिन्हा यांच्या या घोषणेकडे तुमचा पक्ष कशा पद्धतीने बघतो, असा प्रश्न विचारला असता, याबद्दल तुम्ही भाजपचे अध्यक्ष किंवा प्रवक्त्यांना भेटून विचारा, असे उत्तर यादव यांनी दिले. भाजपकडून अद्याप अशी अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे आता त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.