दोन भारतीय जवानांचे हत्याप्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची भारताची इच्छा नसल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी संयुक्त राष्ट्रांतर्फे करण्यात यावी, हा पाकिस्तानचा प्रस्ताव भारताने गुरुवारी सपशेल फेटाळला.
गेल्या मंगळवारी (ता. ८) पाकिस्तानी लष्कराने पुंछ क्षेत्रात हल्ला करून दोन भारतीय जवानांची निर्घृण हत्या केली. पाकिस्तानचे हे सैतानी दुष्कृत्य आणि त्यानंतरच्या घडामोडींची माहिती गुरुवारी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीस दिली.
या समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले, की आम्ही या घटनेचे आंतरराष्ट्रीयीकरण कदापि होऊ देणार नाही. संयुक्त राष्ट्रांना तिची चौकशी करू देणार नाही.
या घटनेची चौकशी संयुक्त राष्ट्रांतर्फे करण्यात यावी असा प्रस्ताव पाकिस्तानने ठेवला आहे. त्याचबरोबर सीमेपलीकडून ६ जानेवारी रोजी झालेल्या गोळीबारात एका पाकिस्तानी सैनिकाचा मृत्यू झाल्याची अधिकृत तक्रारही पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या भारत-पाकिस्तानातील लष्करी निरीक्षण गटाकडे केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की-मून यांचे प्रवक्ते मार्टिन नेसिर्की यांनी गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली. १९४९ मधील एका अधिकृत करारानुसार काश्मीरमधील शस्त्रसंधीवर लक्ष ठेवण्यासाठी हा गट नेमण्यात आला असून, त्यात सुमारे ४० लष्करी निरीक्षकांचा समावेश आहे.
मात्र या लष्करी निरीक्षण गटाची या प्रकरणात काहीही भूमिका नसल्याचे सांगून राष्ट्रीय संरक्षण सल्लागार शिवशंकर मेनन यांनी हे प्रकरण द्वीपक्षीय चर्चेनेच सोडविले जाऊ शकते, ही बाब अधोरेखित केली.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेला तणाव चर्चेच्या मार्गाने दूर करावा, तसेच या दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचा आदर करावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. मात्र हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची इच्छा नसल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी संयुक्त राष्ट्रांतर्फे करण्यात यावी, हा पाकिस्तानचा प्रस्ताव भारताने गुरुवारी सपशेल फेटाळला.
पाकिस्तानचा आशावाद
भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीभंगाच्या घटनांमुळे या देशांदरम्यानची शांतता चर्चेची प्रक्रिया बाधित वा बंद होणार नाही, असा आशावाद पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.