पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा रुपयापेक्षाही खाली गेली असल्याची टीका आज सोनिया गांधी यांनी केली.  ‘मोदी सरकारच्‍या काळात दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. जागातिक बाजारपेठेत जशी रुपयांच्‍या किमतीची घसरण होत आहे, त्‍यापेक्षाही अधिक घसरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या प्रतिमेचे होत आहे’, असे सोनिया गांधी म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारच्या डीएनएबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार सोनियांनी यावेळी घेतला. नरेंद्र मोदी यांनी आपली ५६ इंचाची छाती दाखवून भारतीय जनतेला खोटी आश्वासन दिली असे त्या म्हणाल्या. दरवर्षी एक कोटी नोकऱ्या देणार असे आश्वासन त्यांनी दिले होते त्याचे काय झाले असा सवाल त्यांनी यावेळी केला. काँग्रेसने कायम बिहारचा आणि येथील लोकांचा सन्मान केला आहे. त्यांच्या प्रतिभेचा आदर केला आहे. मात्र, काही लोकांना बिहारला कमीपणा दाखवण्यात आनंद मिळतो. बिहारचा स्वाभिमान दुखवणाऱ्यांना त्यांची जागा या निवडणुकीत दाखवा असे त्या म्हणाल्या.  तसेच, मोदी सरकारने शोबाजी शिवाय काय केलं, असा सवाल करत सोनिया गांधींनी मोदींवर निशाणा साधला.