मोदी सरकारने दिखाऊपणाखेरीज काहीही केलेले नाही, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथील सभेत टीकास्त्र सोडले. जनता दल, राष्ट्रीय जनता दल तसेच समाजवादी पक्षाच्या नेत्यांसमवेत सोनियांनी ‘स्वाभिमान सभेत’ केंद्रावर चौफेर टीका केली.
एक कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन सरकारने पाळले तर नाहीच, पण सरकारी नोकरीच्या संधीही मर्यादित केल्याचा आरोप केला. मनरेगासारख्या महत्त्वाच्या सामाजिक सुरक्षा योजनांवरील निधीत कपात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नितीशकुमारांवर ‘डीएनए’वरून टीका केली होती. त्याचा उल्लेख करत सोनियांनी मोदींवर टीका केली. बिहारचा उल्लेख बिमारू राज्य म्हणून करत जनतेचा अवमान करत असल्याचा आरोप केला.
भूसंपादन विधेयक रेटण्याच्या प्रयत्नात असलेल्या सरकारला जनतेने चपराक लगावली असून, गरिबांची जमीन घेऊन श्रीमंत मित्रांना वाटण्याचा डाव आहे. सीमेपलीकडून पाकिस्तानच्या गोळीबारात आपले जवान शहीद होत असताना तसेच स्थानिक नागरिकांचा बळी जात असताना सरकारकडे ठोस धोरण नाही. यापूर्वी पाकिस्तानवरून मोदी मोठी भाषणे देत, आता आपले जवान शहीद होत असताना सरकारकडे कोणते धोरण आहे, असा सवाल त्यांनी केला. आर्थिक अरिष्टालाही सोनियांनी मोदींना जबाबदार धरले. भ्रष्टाचारमुक्त देश करण्याच्या मोदींची घोषणा हवेत विरल्याचा आरोप सोनियांनी केला. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका लालूप्रसादांनी केली. मोदी आमच्यावर जंगलराज निर्माण करणार असल्याची टीका करतात, मात्र आम्ही मंगलराज निर्माण करू, असा टोला लालूंनी लगावला. सभेला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांचे बंधू व उत्तर प्रदेशातील मंत्री शिवपाल यादव उपस्थित होते.

नितीशकुमारांकडून स्वाभिमानाचा मुद्दा
डीएनएवरून नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केले होते ते मागे घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. राजकारणात विरोधकांचाही सन्मान केला पाहिजे असे सांगत या मुद्दय़ावरून स्वाभिमान अभियान सुरू करत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाटण्यात ही सभा होत असतानाच भूसंपादनावरून केंद्र सरकारला झुकावे लागल्याचे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. बिहारमध्ये जंगलराज येणार असल्याची भीती मोदी दाखवतात, मात्र उपेक्षितांना हक्कांची जाणीव झाली आहे. त्यामुळे भाजपला भीती वाटत असल्याचा आरोप नितीशकुमारांनी केला.
‘ही तर अपमान रॅली’
काँग्रेस, जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलाची सभा स्वाभिमान नसून अपमान रॅली होती, असे टीकास्त्र भाजपने सोडले आहे. चारा घोटाळ्यामध्ये अडकलेल्या लालूप्रसाद यादव यांच्याबाबत सोनियांनी प्रतिक्रिया द्यावी, असे आव्हान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिले. पाकिस्तानच्या मुद्दय़ावरून सोनियांनी सरकारवर टीका केली होती. मात्र दहशतवादाच्या मुद्दय़ावर आम्ही तडजोड केली नाही हे देशाला माहीत आहे, असे उत्तर प्रसाद यांनी दिले.