काँग्रेसमध्ये राहुलविरोधी गटाचे महत्त्व कमी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पं. नेहरू यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी अन्य नेत्यांनी बोलाविलेल्या बैठकीस जाण्याचे टाळले. ही बैठक काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी बोलावली होती. सोनिया गांधी या बैठकीस अपेक्षितच नव्हत्या, अशी सारवासारव काँग्रेस नेते करीत असले तरी प्रत्यक्षात जवाहरलाल नेहरूंशी संबंधित कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीला पक्षाध्यक्षांची अनुपस्थिती अनेक बदलांचे संकेत देणारी आहे.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यावरील टपाल तिकीट यापुढे प्रसिद्ध न करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय काँग्रेसला चांगलाच झोंबला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांतच केंद्रातील दशकभरापासून अस्तित्वात असलेले काँग्रेस सरकार जमीनदोस्त झाले. नव्या सरकारने या जयंतीवर्षांत कोणत्याही मोठय़ा कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. काँग्रेस पक्षाने प्रदेश व केंद्रीय स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राज्य प्रदेश अध्यक्षांची आज बैठक आयोजित केली होती. ही बैठक द्विवेदी यांनी घेतली. अनेक नेत्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले. सोनिया गांधींच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेस नेत्यांनाच नेहरू जयंतीच्या कार्यक्रमांचे महत्त्व राहणार नसल्याची प्रतिक्रिया या बैठकीत उपस्थित नेत्याने दिली. राज्य प्रदेश अध्यक्षा व खा. अशोक चव्हाणदेखील बैठकीला अनुपस्थित होते. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे नियोजन करण्यात व्यस्त असल्याने बैठकीला आलो नसल्याचे चव्हाण म्हणाले. द्विवेदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ७ व ८ नोव्हेंबरला दिल्लीत परिसंवाद आयोजनाचा निर्णय झाला.